डॉ.विश्वनाथ कराड
संस्थापक
डॉ. एस. एन. पठाण
समन्वयक, मूल्याधिष्टीत वैश्विक शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास प्रमाणपत्र परीक्षा
अभियांत्रिकी Engineering/Technical शिक्षणाची व्यवस्था महाराष्ट्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावी या उद्देशाने प्रा. डॉ. विश्वनाथ दादाराव कराड यांच्या प्रयत्नास महाराष्ट्राचे तत्कालीन द्रष्टे मुख्यमंत्री कै. मा.पद्मभूषण वसंतदादा पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य हे आज भारतातील उच्च तांत्रिक शिक्षणाचे आद्य केंद्र बनले आहे. त्याच्यातूनच प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी माईर्स् एमआयटी या शिक्षणसंस्थेची 1983 साली
पुणे येथे स्थापना केली, व त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली संस्थेने अत्यंत कमी वेळात उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात स्वत:चे एक भक्कम असे वैशिष्ठ्यपूर्ण स्थान निर्माण केले. आज या संस्थेची एकूण 63 शैक्षणिक महाविद्यालये महाराष्ट्रात विखुरलेली असून संस्थेत 65,000 आभियांत्रिकी, वैद्यकीय,व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र अशा विविध शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.एमआयटी या शिक्षण संस्थेची गुणवत्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नुकताच या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा बहाल केला आहे.
विश्वशांती केंद्राची स्थापना व मुल्याधिष्टीत शिक्षणाचा ध्यास
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या जीवनावर विद्यार्थी दशेतच पडला आणि त्यांचे जीवनच जणू बदलून गेले. ज्येष्ठ भगिनी त्यागमूर्ती कै. प्रयागअक्का कराड यांच्या आग्रहानुसार आळंदी येथे इंद्रायणीकाठी ''आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या'' माध्यमातून भक्कम दगडी घाट बांधण्यात आले आणि तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज आणि तत्त्वज्ञ संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद या संस्थेस लाभला. ' विज्ञान आणि अध्यात्म यांच्या माध्यमातूनच जगामध्ये समन्वय व शांती नांदू शकेल' या स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी आपले कार्य सुरु केले आणि १९९६ साली त्यांनी विश्वशांती केंद्र ( आळंदी) ची स्थापना केली.
माईर्स एमआयटी या शिक्षणसंस्थेत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी अनेक शेक्षणिक प्रयोग राबविले. ब्रिटिशांनी ( मेकॉलेप्रणीत) घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीमुळे प्रचलित शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही हे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी ओळखले. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करून त्यातून या विषयावर खूप चर्चा घडवून आणली आणि भारतीय ''मुल्याधिष्टीत शिक्षणपद्धती'' चा अंतर्भाव आपण आपल्या शिक्षणपद्धतीत करू शकलो नाही हा एकच निष्कर्ष त्यातून निघाला.भारतीय संस्कृती ही फार प्राचीन असून काळाच्या कसोटीवर काही वैश्विक मूल्ये ( universal values ) आपण जोपासली आहेत. उदा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथीदेवो भव इ. मूल्यांचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर संस्कारक्षम अवस्थेत प्रभाव पडल्यास, अशा विद्यार्थ्यांचे जीवनच बदलून जाईल व त्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्या रुपाने सक्षम युवक तयार होतील आणि हेच संस्कारक्षम तरुण आपल्या भारतदेशाला महान करू शकतील, हा एकच ध्यास प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी घेतला.