परीक्षेबद्दल

युनेस्को (पॅरिस) चे अध्यासन

प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली नाही तरच नवल! शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या युनेस्को (पॅरिस) या संस्थेने प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या कार्याची १९९८ साली दखल घेऊन त्यांना मानवाधिकार ( Human Rights), लोकशाही( Democracy),शांती (peace) आणि सहिष्णुता(Tolerance)या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी युनेस्कोचे अध्यासन देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. विश्वशांती केंद्र (आळंदी) च्या वतीने युनेस्कोचे हे अध्यासन चालविले जाते. त्यातूनच विश्वशांती केंद्र युवा मंचची (wpcyouthmission.org) स्थापना करण्यात आली व अनेक युवक, युवती आज या युवा मंचच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात कार्य करताना दिसतात.

विश्वशांती केंद्र अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम

मूल्याधिष्टीत शिक्षणाचा समावेश प्राथमिक शाळेत व माध्यमिक स्तरावरील शिक्षणात करावा या बद्दल कुणाचे दुमत नाही. राज्य शासन देखील यासाठी कटिबद्ध आहे. परंतु प्रचलित शिक्षणाच्या ढाच्यात या कार्यक्रमास किती आणि कशी जागा द्यायची याचे मात्र समाधानकारक उत्तर कुणीच देऊ शकत नाही, म्हणून हा एवढा उपयुक्त अभ्यासक्रम की ज्या शिक्षणातून चारित्र्यवान विद्यार्थी घडविले जातात असा उपक्रम आपल्या हातातून जाऊ नये, म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर केवळ शिक्षण पद्धतीला दोष न देता स्वत:हून पुढे आले व विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करून चारित्र्यवान युवक घडविण्यासाठी ''वैश्विक मूल्याधिष्टीत शिक्षण व यशस्वी व्यक्तिमत्व विकास'' हा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम एमआयटी विद्यापीठ विश्वशांती केंद्र (आळंदी) या केंद्राद्वारे तयार करण्यात आला. राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, मा. कुलगुरु, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक व शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम तयार झाला आहे. या अभ्यासक्रमावर आधारित मुल्यशिक्षणातून चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास साधून एक यशस्वी माणूस घडविण्यासाठी हा उपक्रम विश्वशांती केंद्राने हाती घेतला आहे.


पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे

आजवर 'शिक्षण' या विषयावर जगामध्ये हजारो वर्षापासून अनेक थोर शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ यांनी सखोल चिंतन करून, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या शिक्षणपद्धतीचा अवलंब केला आहे. परंतु अजूनही शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाचे कल्याण चिंतणारा, खऱ्या अर्थाने चारित्र्यसंपन्न असा माणूस घडवू शकलो नाही वा आपण कोठेतरी कमी पडलो, ही शिक्षण व्यवस्थेतील एक उणीव दूर करण्याचा विश्वशांती केंद्र ( आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणेचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशाला आपापली वेगवेगळी संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, इतिहास व भूगोल असतो. परंतु वैश्विक नियमानुसार, काळाच्या कसोटीवर उतरणारी काही चिरंतन मानवी मूल्ये एकच असतात. ही चिरंतन वैश्विक मूल्ये भारतीय संस्कृतीने मनापासून जोपासलेली आहेत. या वैश्विक मुल्यांची खऱ्या अर्थाने ओळख जगभरच्या भावी पिढीला व्हावी व ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयात रुजली जावीत व त्यातून एक आदर्श व यशस्वी व्यक्तिमत्व घडावे, असा आमचा प्रयत्न आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचन, सामान्यज्ञान, भाषा,गणित, विज्ञान, अध्यात्म, क्रीडा, संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, भारतीय अस्मिता, वैयक्तिक आणि सार्वजनिक शिस्त आणि स्वच्छता, स्वावलंबन, भूतदया, निर्भयता, शिस्तप्रियता, समता, बंधुभाव, सौजन्यशीलता, प्रेम व आदरभाव, सत्यप्रियता, अहिंसा, धर्मसंकल्पना, निसर्गप्रेम, संयम, राष्ट्रभक्ती, विनम्रता, राष्ट्रीय एकात्मता, आपले आई-वडिल, थोरा-मोठ्यांविषयी व गुरुजानांविषयीचा आदरभाव, जगभरातील संत, शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील थोर विभूतींचे मानव कल्याणाचे योगदान, यशस्वी व्यक्तिमत्व विकासाचे बौद्धिक, भावनिक आणि अध्यात्मिक गुणक (IQ, EQ,SQ) सारखे पैलू या विविध विषयाच्या अनुषंगाने या परिक्षेत प्रश्न विचारले जातील.

राज्यस्तरीय विभागीय पुरस्कार

'वैश्विक मुल्याधिष्टीत शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास' ही परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून घेण्यात येणार आहे. सदरील परीक्षा ( नववी उत्तीर्ण, दहावीला बसलेले वा दहावी उत्तीर्ण झालेले व इयत्ता ११ वीत असलेले) सदरील परीक्षा ( इयत्ता ९ वी, १० वी आणि ११ वी ला असलेले विद्यार्थी) महाराष्ट्रातील सर्व जिल्हास्तरीय केंद्रावर घेण्यात येईल. या शिवाय विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्येनुसार तालुका स्तरावरही परीक्षा केंद्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्येनुसार काही नवीन परीक्षाकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येतील यासाठीची प्रवेश नोंदणी शुल्क रु.१२०/- इतके राहील.

सदरील परीक्षेमध्ये राज्यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्णपदक व रोख बक्षीस रु. ११,०००/-, दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यास रौप्य पदक व रोख बक्षीस रु. ९,०००/- व तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यास कास्य पदक व रोख बक्षीस रु. ७,०००/- चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी उत्तेजनार्थ रोख बक्षीस रु. ५,०००/- आणि रु. ३,०००/- आणि तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माउलींची प्रतिमा (स्मृतीचिन्ह) व पाचही पुरस्कार्थींना विश्व शांती केंद्र ( आळंदी) चे बोधचिन्ह असलेले प्रमाणपत्र दिले जाईल.

विभागीय पातळीवर पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे खालीलप्रमाणे रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. विदर्भ, मराठवाडा,खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण आणि मुंबई असे एकूण ६ विभागासाठी पहिल्या तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे रोख पारितोषिक रक्कम रु. ५,०००/-, ३,०००/- व २,०००/- आणि उत्तेजनार्थ चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी रु.१,०००/- रोख पारितोषिक, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा (स्मृतीचिन्ह) व विश्वशांती केंद्र (आळंदी) चे बोधचिन्ह असलेले प्रमाणपत्र दिले जाईल.